नवी दिल्ली – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा (एएचएआय) ‘एक वाहन एक फास्टॅग’ नियम कालपासून देशभरात लागू झाला. यापूर्वी मार्च महिन्यात हा नियम लागू करण्यात येणार होता, मात्र केंद्राने एक महिन्याचा दिलासा देत याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली होती. त्यामुळे अखेर १ एप्रिलपासून हा नियम लागू झाला.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या नियमामुळे आता एका वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग जोडता येणार नाहीत. ज्या लोकांकडे एका वाहनाशी लिंक असलेले एकाहून अधिक फास्टॅग आहेत. त्यांचे एक सोडून इतर फास्टॅग १ एप्रिलपासून बंद होतील. आपले इतर फास्टॅग बंद करण्यासाठी वा त्यातील बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी आरबीआय आणि पीपीबीएलने ग्राहकांना १५ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. दरम्यान,इलेक्ट्रिक टोल प्रणालीची कार्यक्षमता अधिक सुधारावी आणि टोल प्लाझावरील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.