अमरावती – स्थानिक रुक्णिनीनगर येथील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालसुधार गृहातील एक अल्पायवीन मुलाने बाथरुमच्या बाजुचा टिन काढून तो पसार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. फ्रेजरपुरा पोलिसांनी काळजीवाहक राजू सावळे (५९ रा. विठाईनगर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. विजय कॉलनी, रुक्मिनीनगर येथील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहात कनिष्ठ काळजीवाहक राजू सावळे आहेत. २२ जुलैला त्यांची रात्रपाळी ड्युटी होती. रात्री ९ वाजता ते कर्तव्यावर हजर झाले. त्यावेळी बाल न्याय मंडळाचे ९ बालक रुममध्ये होते आणि बालकल्याण समितीच्या रुममध्ये १२ बालक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वर्ग दहावीमध्ये शिकणारे ४ बालक गेट खोलून शिकवणीकरीता गेले. त्यानंतर सावळे वरील माळ्यावर बाल कल्याण समितीच्या रुममध्ये गेले असता त्यांना ११ बालक दिसले. एक बालक कुठे गेला, याबाबत विचारपूस केली असता तो बाथरुमच्या बाजुचा टिन काढून जिण्यावरून उडी घेऊन पळून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. सावळे यांनी बालकाचा शोध घेतला. परंतु तो कुठेच मिळून आला नाही. त्यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली.त्याआधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.