मुंबई – बारामती, अहमदनगरनंतर आता मुंबईतील मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही घटनेचा आढावा घेतला.
मुलुंडमध्ये बीपी सिंग रोडवर असलेल्या वसुदा अपार्टमेंटमध्ये भाजपच्या वॉर रूम मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे ठेवल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या इमारती बाहेर राडा केला आहे. या वेळी पोलिसांनी सौम्य बलाचा वापर ही केला आहे. मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते घटना स्थळी दाखल झाले आहेत. प्रचंड तणावाची स्थिती इथे निर्माण झाली होती.तर पोलिसांनी असे काही ही पैसे मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
आदित्य ठाकरे म्हणले, मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते. आमच्या लोकांनी पोलिसांना बोलावलं मात्र पोलीस आले नाही. या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे ते आपणही व्यवस्थित बघा. जे काम निवडणूक आयोगाचा आहे ते करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. पुण्यात देखील असा प्रकार घडला होता. त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आंदोलनाला बसले होते. निवडणूक आयोग त्यांचे काम करत नाही त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते.
प्रसाद लाड म्हणाले, संजय पाटील यांना त्यांचा पराभव दिसू लागला त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला त्यांनी केला. हा हल्ला सहन केला जाणार नाही. खोट्या तक्रारी करुन महिलांवर हल्ला करण्याचा जो प्रकार घडला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. ज्या पद्धतीने गुंड प्रवृत्तीचे उमेदवार दिले आहेत, ज्यांच्याबरोबर गुंड प्रवृत्तीचे लोक फिरत आहेत त्यांच्याकडून अपेक्षाच ही आहे. ठाकरे गटाने केलेले आरोप खोटे आहेत. निवणूक आयोगाची अधिकारी देखील कार्यालयात गेले तेथे काहीच मिळाले नाही. पराभवाची जी भीती निर्माण झाली त्यातून हे संजय राऊत आणि त्यांच्या भावाने केलेले कृत्य आहे. त्यातून हा प्रकार घडला आहे. कायद्याच्या माध्यमातून याचे उत्तर दिले जाईल.