अयोध्या – उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारलेल्या श्रीराम मंदिरात श्री रामलल्लाला उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी गर्भगृहात कुलर बसवण्यात आला आहे,अशी माहिती श्रीराम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली. आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, न्यासाने गर्भगृहात कुलरची व्यवस्था केली आहे. वातानुकूलित यंत्रणाही बसवण्यात येणार आहे. श्री रामलल्लाला उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी त्याचा नैवद्यही बदलला आहे.या नैवेद्यात दही आणि दुधापासून बनवलेली खिर दिली जात आहे.तसेच हंगामी फळेही दिली जात आहेत.तसेच श्री रामलल्लाला हाताने विणलेले कपडे घातले जात आहेत.उद्या मंगळवारी हिंदू नववर्षाच्या दिवशी चांदीच्या पिठावर कलश स्थापित केला जाईल. यानंतर ९ दिवस श्री रामलल्लासोबत श्री दुर्गा देवीचीही पूजा केली जाणार आहे.चैत्र नवरात्र काळात विहित पूजेच्या पद्धतीनुसार मातृशक्तीची पूजा केली जाईल.९ दिवस प्रतिदिन दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाईल.रामनवमी तिथीला श्री रामलल्लाला ५६ प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातील आणि सर्व भाविकांना प्रसाद वाटण्यात येईल. दशमी तिथीलाही प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.