मुंबई – राज्यात उद्योग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्याला पुढील वर्षापासून ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. यासोबतच मुंबईतील नरिमन पॉईंटजवळील उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
महाराष्ट्र सरकारने गेल्या २८ जुलै २०२३ रोजी रतन टाटा यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार जाहीर केला होता. यावेळी महाराष्ट्रात काम करणाऱ्या उद्योगपतींना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आले होते. तरुण आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला असून याच पुरस्काराचे नाव आता ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ असे असणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने रतन टाटा यांना एकप्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे.
नरिमन पॉईंट येथे फार मोठं उद्योग भवन उभं करण्यात येत आहे. त्याची रचना ही वेगळ्या पद्धतीने करण्यात येत असून उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन त्यांची स्मृती आणि त्यांचे काम कायमस्वरुपी लोकांच्या लक्षात राहायला हवं, असंही सामंत म्हणाले.