छत्रपती संभाजी नगर- जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधब्यावर रिल्स, सेल्फी,फोटोसेशन करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.धबधबा हा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने जीवाची बाजी लावून कुणी रील्स,सेल्फी अथवा फोटोसेशन केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अजिंठा लेणी हा परिसर पावसाळ्यात धबधब्यांसाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.मागील आठवडाभरापासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे अजिंठा डोंगररांगामधून वाहणाऱ्या छोट्या-मोठ्या नद्या-नाले प्रवाहीत झाले आहेत.अजिंठा लेणी परिसरातील डोंगर दऱ्यांनी जणू हिरवा शालूच नेसला आहे.त्यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.मात्र आतापर्यंत अनेक ठिकाणच्या धबधब्यांवर फोटो, रिल्स काढताना पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना झाल्या आहेत.हीच बाब लक्षात घेऊन फर्दापूर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.