आपापल्या धर्मातील शांती संदेश धर्म गुरूंनी समाजात रुजवावा

0

मुंबई  – देशात धार्मिक विद्वेषाचा वनवा पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. अशा वेळी सर्व धर्मातील धर्मगुरूंनी आपापल्या धर्मातील शांतीचासंदेश समाजात रुजवून विद्वेषाचा वनवा शांत करावा, असे आवाहन वारकरी विचार मंचचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित सर्व धर्मीय सद्भावना संमेलनात ते बोलत होते. या संमेलनाला विविध धर्मातील धर्म गुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, ज्या वेळी धर्माचा आधार घेऊन स्वार्थासाठी सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रयत्न होतात. सच्चा धर्माच्या विचारांना बाजूला सारून धर्माच्या नावाने पाखंडीपणा केला जातो तेव्हा खऱ्या धार्मिकांना त्या पाखंडाचं खंडन करून खऱ्या धर्माच रक्षण करावं लागतं. आज धर्माच्या नावाने जो उच्छाद मांडला जात आहे, माणसा माणसांत दरी निर्माण केली जात आहे. विद्वेषाचा वणवा भडकवला जात आणि त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तेव्हा खऱ्या धार्मिक लोकांनी, सच्चा धर्म गुरूंनी एकत्र येऊन हे धर्माचे विडंबन आणि त्या आधारे केले जाणारे राजकारण हाणून पाडले पाहिजे. कारण कोणताही धर्म विद्वेषावर आधारलेला नसतो तर प्रेम हीच धर्माची शिकवण असते.

मजहब नही सिखाता आपस में बैर रखना : मात्र आज धार्मिक उन्माद, त्यातून धार्मिक द्वेष भडकलेला दिसतो आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. त्यासाठी काही लोकांना हाताशी धरून सतत परधर्मीयांबद्दल द्वेष पसरविला जात आहे. या काळात सच्चा धर्म गुरूंनी पुढे येऊन हा विद्वेषाचा वणवा शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही शामसुंदर महाराज म्हणाले.

मंगळवार, दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात सर्व धर्मातील धर्म गुरूंचे सद्भावना संमेलन आयोजित करण्यात आले होते. धार्मिक जन मंचच्या या आयोजनात डाॅ. रफिक सय्यद पारनेरकर यांनी महत्वाची भूमिका निभावली. या संमेलनाला इस्लामचे उपासक मौलाना, जमात ए इस्लाम हिंदचे राष्ट्रीय पदाधिकारी, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू फादर, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासक, हिंदू धर्मातील साधू, सन्याशी, बैरागी, वेदशास्त्र पंडित, निरंकारी, तुकडोजी महाराज परंपरेतील गुरूदेव संप्रदायाचे प्रबोधनकार, बौद्ध भिकू, भंत्ते उपस्थित होते. सकाळी 10.00 ते दुपारी 5.00 वाजेपर्यंत चाललेल्या या संमेलनात सर्वच धर्माच्या, संप्रदायाच्या धर्म गुरुंनी सध्या देशात वाढत असलेल्या द्वेषाच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली.

सर्वच धर्मगुरुंनी आपापल्या पातळीवर, आपापल्या कीर्तन, प्रवचन, व्याख्यानातून सामाजिक सद्भावनेचा संदेश रुजविण्याचा संकल्प केला. यावेळी ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, धर्मकीर्ती महाराज परभणीकर, भरत महाराज गुट्टे, माऊली महाराज उखळीकर, ज्ञानेश्वर महाराज रक्षक, संदीप पाल, राम पाल, पंकज पाल, ह.भ.प. मुबारक महाराज शेख, सूरज महाराज लवटे, फादर मायकल, भदंत पय्याबोधी थेरो, मौलाना इलियास फलाही, गॅनी आवतार सिंग, डॉ. रफिक सय्यद पारनेरकर, दिल्ली येथून जमते इस्लामी हिंद चे उपाधक्षक इंजिनियर सलीम , डॉक्टर मंगेशदा, डॉक्टर राहुल बोधी, शाकीर शेख, शफी फारुकी, स्त्यानंम दास बाबा, डॉ. रविकुमार स्टीफन, मौलाना अगा रुहे जाफर, इस्कॉनचे केशव चंद्रदास, एडवोकेट संभाजी बोरुडे मुकुंद सोनटक्के, श्रीगोंदा शाहीर निजामभाई, बबन दांडेकर मोहम्मद हबीदिन सय्यद नांदेड आदी धर्म गुरू उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech