मुंबई – तेलंगणातील हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याने २०१६ रोजी आत्महत्या केल्यानंतर देशभरात आंदोलन उभे राहिले होते. रोहित वेमुलाला न्याय देण्यासाठी अनेक आंबेडकरवादी संघटना पुढे आल्या होत्या. या प्रकरणातील ताजी माहिती आता समोर आली आहे. तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाची फाईल आता बंद केली आहे. तसेच सर्व आरोपींना क्लीन चीट दिली आहे. रोहित वेमुला हा दलित नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान रोहित वेमुलाच्या कुटुंबियांनी पोलिसांवर आरोप करत ते भाजपाची मदत करत असल्याचा आरोप केला तसेच या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडावी, अशी मागणी केली.
पोलिसांनी सांगितले की, रोहित वेमुला दलित नव्हता. त्याची खरी जात लोकांना समजेल या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली. पोलिसांचा हा दावा रोहितच्या भावाने मात्र फेटाळून लावला आहे. पोलिसांचा तर्क समजण्यापलीकडून आहे. आम्ही याचा निषेध करतो. लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणात चौकशी सुरू राहावी, यासाठी फाईल पुन्हा उघडण्याची मागणी करणार आहोत.
हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी रोहित वेमुला याने २०१६ साली आत्महत्या केली होती. याचे पडसाद विद्यापीठासह देशभर उमटले होते. त्यानंतर या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती अशोककुमार रुपनवाल यांच्या एक सदस्यीय अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली. या समितीकडे या प्रकरणी घडलेल्या घटनांच्या नोंदी ठेवण्याचे आणि या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.