सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निशाण तलाव परिसरात पट्टेरी वाघाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. या वाघाने आतापर्यंत गोठ्यातील सहा जनावरांचा बळी घेतल्याचे सांगितले जात आहे. वनविभागाने याची दखल घेऊन तत्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील महिनाभरापासून या पट्टेरी वाघाने निशाण तलाव परिसरात ठाण मांडले आहे. मात्र आता हा वाघ हळूहळू मानवी वस्तीकडे वळू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यत बिबटे, गवे आणि हत्ती हे मानवी वस्त्यांमध्ये घुसून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करत होते. मात्र आता वडखोल या गावातील वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलाव परिसरात पट्टेरी वाघाने आपले बस्तान ठोकले आहे. शहरातील थेट भटवाडी परिसरापर्यंत हा वाघ फिरत आहे. दिलीप सामंत यांच्या गोठ्यातील वासरावर हल्ला करून या वाघाने पळ काढल्याची घटना नुकतीच घडली आहे. वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे.