तापमानवाढीमुळे मुरुडमधील सुपारीचे पीक धोक्यात

0

मुरुड-जंजिरा – मुरुड तालुक्यातील तापमानाचा पारा चाळीस अंशावर गेल्यामुळे येथील सुपारीचे पीक धोक्यात आले आहे.सुपारीच्या झाडांना नुकतीच फलधारणा होऊन तयार झालेली छोटी छोटी फळे वाढत्या तापमानामुळे गळू लागली असून सुपारीच्या छोट्या झाडांच्या पानांवर (झावळ्यांवर) करपासदृश रोग पडल्याचे‌ही दिसून येत आहे. त्यामुळे सुपारी पीक धोक्यात आले आहे. मुरुड तालुक्यात ४१६ हेक्टरवर सुपारीची लागवड करण्यात आली असून जवळपास १५०० सुपारी बागायतदार आहेत.ते सर्वजण प्रती वर्षी ४०० ते ४५० खंडी ( १ खंडी म्हणजे ४०० किलो)असोली सुपारी पिकवतात.निसर्ग वादळात सुपारीचे १४१ .३६ हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्यामुळे या उत्पादनात मोठी घट आली झाली आहे.त्यात सुपारीच्या झाडांसह फळेही दरवर्षी त्यांना ग्रासणार्या विविध रोगांना बळी पडत आहेत.

सध्या मुरुड तालुक्याच्या सरासरी तापमानात सतत चढउतार होत आहेत.चालू वर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला. एप्रिल महिन्याच्या अखेरीस तर तापमानाने चाळीस अंशाचा आकडाही पार केला होता. सुपारीच्या झाडांना अतिउष्णता सहन होत नाही.याच हंगामात या वाड्या बागायतींमधील झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी खोदण्यात आलेल्या विहिरी तळ गाठतात.यावेळी पाणी काढण्यासाठी विहीरींवर बसवण्यात आलेले पंप पाण्याचा उपसा करतांना नजीकच्या समुद्राच्या पाण्यातील क्षार खेचतात क्षारयुक्त पाणी व वाढत्या तापमानाचा वाईट परिणाम सुपारी झाडे -फळांवर होऊन फळ गळ, करपासारख्या रोगांना ती बळी पडत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे.

सुपारीच्या छोट्या छोट्या झाडांवर पडणाऱ्या करपा सद्रुश्य रोगात झाडांना नव्याने फुटणारी कोवळी पाने कडक उन्हात वाळतात. पानांवर तांबूस तपकिरी डाग पडतात.झाडांची वाढ खुंटते.तसेच फेब्रुवारी -मार्च महिन्यात झाडांना लागलेली छोटी छोटी फळे उष्ण वातावरणात गळू लागतात. या कालावधीत पाण्याची कमतरता झाल्यास गळ अधिक होते. या खेरीज सुपारी झाडांना भेडसावणार्या अन्य अनेक रोगांनीही या उत्पादनावर परिणाम होत आहे.या सर्व रोगांवर दापोलीच्या कृषी विद्यापीठांतून संशोधन होऊन त्या वरील उपाययोजनांची माहिती बागायतदारांना करून देणे गरजेचे आहे, असे म्हटले जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech