तिरूपती प्रकरणी सुब्रमण्यम स्वामींची सुप्रीम कोर्टात याचिका

0

नवी दिल्ली – तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आणि मासळीचे तेल वापरत असल्याचे आरोप झालेत. याप्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. स्वामी यांनी आंध्र प्रदेश सरकारला लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपाचा स्त्रोत आणि नमुने याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली. न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांकडून फॉरेन्सिक अहवाल मिळविण्यासाठी अंतरिम निर्देश जारी करावेत, अशी विनंतीही त्यांनी केली. प्रसाद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध घटकांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांच्या गुणवत्तेची किंवा त्यांची कमतरता यावर देखरेख आणि पडताळणी करण्यासाठी अंतर्गत नियंत्रणे असायला हवी होती असे याचिकेत म्हटले आहे. स्वामींनी ट्विटरवर (एक्स) त्यांच्या याचिकेबद्दल पोस्ट देखील केली आहे. या पोस्टमध्ये स्वामी म्हणाले की, ‘आज मी सर्वोच्च न्यायालयाकडे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली आहे. तिरुपती तिरुमला मंदिरातील प्रसादात प्राण्यांचे मांस आणि इतर कुजलेल्या पदार्थांची भेसळ असल्याचा आरोप नायडू यांनी केला आहे.

याशिवाय तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (टीटीडी) माजी अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य व्हाय.वी. सुब्बा रेड्डी यांनीही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला. वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात तिरुपतीसाठी लाडू बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता. नायडू राजकीय फायद्यासाठी घृणास्पद आरोप करत असल्याचा दावा वायएसआर काँग्रेस पक्षाने केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech