भुवनेश्वर- ‘अग्नी प्राईम’ या न्यू जनरेशन बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची आणखी एक उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे. भारतीय लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) आणि डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)च्या संयुक्त विद्यमाने ओडिशाच्या डॉ ए पी जे अब्दुल कलाम बेटावर हे उड्डाण यशस्वी करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली.
अग्नी क्षेपणास्त्राचा यशस्वी विकास आणि समावेश हे भारतीय सशस्त्र दलांसाठी एक उत्कृष्ट बलगुणक ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करून या यशाबद्दल भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ, एसएफसी आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले.
अग्नी श्रेणीतील आधुनिक, मारक, अचूक व मध्यम पल्ल्याचे अण्वस्त्रधारी असे हे क्षेपणास्त्र उच्च तीव्रतेचे स्फोटक थर्मोबॅरिक अथवा आण्विक शस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. १५०० ते ३००० किलो वारहेड्स वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राचा पल्ला १२००-२००० किमी आहे. याचे वजन सुमारे ११ हजार किलोग्रॅम आहे. एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत ‘अग्नी प्राईम’ हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात असून यापूर्वी या कार्यक्रमाअंतर्गत पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग व आकाश ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली आहेत.