अरिहा प्रकरणावर चर्चा करण्याची जर्मन राजदूतांची ग्वाही

0

नवी दिल्ली – जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी जर्मन अधिकारी पाळणाघरात असलेल्या अरिहा शाह या भारतीय मुलीच्या मुद्यावर चर्चा करण्यास तयार असतील, असे जर्मनीचे राजदूत फिलिप एकरमन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अरिहाच्या भविष्यासाठी समाधानकारक तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.

भावेश शाह आणि धारा शाह हे मूळचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर विभागातील रहिवासी आहेत. गेली अनेक वर्ष ते जर्मनी येथे कामधंद्यानिमित्त राहतात. त्यांची मुलगी अरिहा ही सात महिन्यांची असतांना किरकोळ मारहाण केल्याचा ठपका जर्मन सरकारने पालकांवर ठेवला. मुलांचे पालक संगोपन करु शकत नाही, हे कारण देत २०२१ साली अरिहाची रवानगी फोस्टर केअर सेंटरमध्ये केली गेली. गेल्या ३८ महिन्यांपासून ही चिमूकली पाळणाघरात असून मुलगी परत मिळावी यासाठी पालक कायदेशीर लढाई लढत आहे, मात्र त्यांना यश मिळत नाही. ती १८ वर्षांची होईपर्यंत जर्मनीत पाळणाघरात राहण्याचा निर्णय दिला गेला आहे.

भारत सरकारने याप्रकरणी मध्यस्थी करुन जर्मन सरकारशी चर्चा करुन तिला भारतात परत आणावे, तिला भारतीय संस्कृती, भाषा शिकवावी, अशी आग्रही मागणी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षानेही एकमुखी पाठिंबा दिला होता. तसे लेखी निवेदन ऑगस्ट महिन्यात खासदार नरेश म्हस्के यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना दिले होते. आता खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश मिळातांना दिसत आहे.

जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ हे ऑक्टोबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. तत्पूर्वी दौऱ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अरिहाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एकरमन म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालय, जर्मन दूतावास आणि बर्लिनमधील युवा प्राधिकरण यांच्या संपर्कातून अरिहाला भारतीय भाषेचे प्रशिक्षण मिळेल असा तत्त्वत: करार करण्यात आम्हाला यश आले आहे. बर्लिन मधील एका घरात जैन समाजाच्या पर्युषण सोहळ्यात अरिहाचा सहभाग आणि मुंबईहून काही विधी शिकवण्यासाठी आलेल्या पुजाऱयाशी झालेल्या संवादाचा संदर्भ देत एकरमन म्हणाले, गेल्या काही महिन्यांत आम्ही जे साध्य केले आहे ते म्हणजे हे भाषेचे प्रशिक्षण तत्त्वत: आहे, भारतीय संस्कृतीचा परिचय आहे आणि सणांचा अनुभव आहे. शाह दांपत्याला महिन्यातून एकदा किंवा दोनदा त्यांच्या मुलीला भेटण्याची परवानगी असल्याची माहिती एकरमन यांनी दिली. या चर्चेदरम्यान भारतही अरिहाची बाजू मांडण्याची स्पष्ट शक्यता असून, कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास जर्मन तयार असल्याचे एकरमन यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech