वाढत्या महागाईमुळे आर्थिक घडी विस्कटली

0

मुंबई – राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा होत असताना मात्र, वाढत्या महागाईमुळे तालुक्यातील नागरिकांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सध्या सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. यातच गॅस सिलिंडरचे दर हजाराच्या आसपास राहिल्याने गोरगरिबांचे कंबरडेच मोडले आहे. रॉकेलचा पर्याय आहे; पण ते आता मिळत नाही. अशा स्थितीत गरिबांची चूल पेटणार तरी कशी? असा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला असून राहिलेली कसर वीज बिलात वाढ करून सर्वसामान्याचे जगणे मुश्किल झाले आहे.

केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर लोकांना गॅस कनेक्शन उपलब्ध झाले. त्यामुळे रेशनवर मिळणारे रॉकेल बंद करण्यात आले. ग्रामीण भागात रॉकेल पूर्णपणे बंद झाले आहे. आता लोकांची मोठी अडचण झाली आहे. गॅस कनेक्शन मिळाले परंतु रोजंदारी करून गॅस सिलिंडर भरणे आता परवडत नाही. त्यामुळे ‘चुलीवरचा धूर परवडला; पण गॅस सिलिंडर नको’ अशी अवस्था आहे. निवडणूक आल्याने सिलिंडरचा दर ३०० रुपयांनी कमी झाला; पण ८०० रुपयांचा सिलिंडरही गरिबांना परवडत नाही. महागाई वाढत आहे.

ग्रामीण भागात नागरिकांची उपजीविकाही हातावर कमविणे व पानावर खाणे अशी आहे. अशा स्थितीत महागडा गॅस सिलिंडर विकत घेणे परवडण्यासारखे नाही. रॉकेलही मिळत नाही. अशा स्थितीत सरपणावर जेवण तयार करावे लागते. पूर्वी रेशनवर रॉकेल मिळायचे आता ते बंद झाले आहे. सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णत: विस्कळीत झाली आहे. एकीकडे समोर आर्थिक अडचणी असताना दुसरीकडे महागाईचा भस्मासुर वाढत आहे. वीज बिल, इंधन आणि घरगुती दरात झालेल्या वाढीमुळे ग्रामीण भागातील महिलांवर आर्थिक ताण आला असून, मजुरी करून उदरनिर्वाह करणे त्यांना जड जात आहे.

तसेच ग्रामीण भागात शेतक-यांसाठी शेती हाच एकमेव पर्याय असून हा व्यवसाय देखील वाढती महागाई अन् निसर्गाच्या लहरीपणामुळे मोडकळीस आला आहे. मागील काही वर्षांपासून वाढती मजुरी, खते, बी-बियाणांच्या जादा किमती, इंधनाचे भडकलेले दर, त्यातच निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाचे कवडीमोल भाव आदी कारणांनी शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. शेतीचा खर्च उत्पादनामधून निघेनासा झाला आहे. त्यामुळे, शेती करायची का ? आणि कशी? असा प्रश्न शेतकरीवर्गाला पडू लागला असून वाढत्या महागाईने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech