अमरावती : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या क्रांतदर्शी महापुरुषाला सोमवारदि.२१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी भावपूर्ण मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून याच कार्यक्रमात सर्वधर्मीय प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना व विश्व शांततेसाठी संकल्प केल्या जाणार आहे.
मौनश्रद्धांजलीच्या वेळेस मुख्य मार्गावरील वाहतुक काही वेळासाठी बंद करण्यात येणार असून संपूर्ण दुकाने काहीवेळाकरिता बंद ठेवण्यात येवून निरव शांततेत ज्याला ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथेच थांबून गुरुदेव भाविकराष्ट्रसंतांना आदरांजली वाहणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अश्विन वद्य पंचमी हा पुण्यतिथी दिन असूनशके १८९० मध्ये महाराजांचे याच दिवशी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी महानिर्वाण झाले होते.
राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुकुंजांत मोठी यात्रा भरते त्याच बरोबर या पुण्यतिथी महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन वैचारिक प्रबोधन केल्या जाते. मौन श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमाकरिता देशभरातील साधुसंत, विद्वान, प्रचारक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते व राज्यातील भाविक मंडळी पालखी दिंड्यासह गुरुकुंज आश्रमातयेतात. पुण्यतिथी महोत्सवातील मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा सर्वात महत्वाचा असतो. मौन श्रद्धांजलीच्याच दिवशी सर्वसंत स्मृति व मानवता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला दुपारी३.३० मिनिटांनी सुरुवात होणार असून या प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवन कार्य आणि विचार लाखो भाविकांना भजन व निवेदनाद्वारे सांगण्यात येतात. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना सुद्धा अतिशय भावपूर्ण वातावरणात होणार आहे. हा श्रद्धांजली सोहळा अनुभवण्यासाठी विल हॅरीस (वाशिंगटन), लायना फर्नांडीस (टेक्सास), तानजा डायमंड (वाशिंगटन), जेर्फी वेस (केलिफोर्निया), निकोल रॅमडम (केलिफोर्निया), व्हिसल पार्क, कोरिना स्टफी, स्टीफन अंडरसन, जॉन्स ऐले (अमेरिका) इत्यादी विदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहे.