मुंबई – माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर गुन्हे शाखेने एकूण १० जणांना अटक केली असून कसून तपास सुरू आहे.
ताज्या तपासादरम्यान, भांडुप परिसरातून दोन देशी बनावटीच्या बंदुकांसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रथम एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले, ज्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल मिळाले. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून दुसरे पिस्तूल जप्त करण्यात आले. या दोन्ही बंदुका तिसऱ्या व्यक्तीने आरोपींना पुरवल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांनी बाबासाहेब सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शस्त्रास्त्र पुरवठा कोणाकडून होत आहे यावर लक्ष केंद्रित केले असून, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी शुभम लोणकर, शिवकुमार गौतम, आणि मोहम्मद जिशान अख्तर अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.
या प्रकरणाबाबत आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात आढावा घेतला असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची भेट घेऊन तपासाची माहिती दिली आहे.