नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी प्रमुख स्वाती मालिवाल यांना मारहाण झाल्याचं प्रकरण आता चांगलंच चर्चेत आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचे माजी सचिव विभव कुमार यांना समन्स धाडलं आहे. तसंच पोलिसांच्या पथकाने स्वाती मालिवाल यांच्या घरी जाऊनही जबाब नोंदवला आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही जबाब नोंदवण्यात येतो आहे. विभव कुमार यांना शुक्रवारी महिला आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या ऑफिसमध्ये एनसीडब्ल्यूने नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत हे स्पष्ट करण्यात आलं आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी विभव कुमार यांनी स्वाती मालिवाल यांना मारहाण केली. या प्रकरणात १७ मे रोजी सुनावणी होणार आहे. विभव कुमार यांनी यासाठी हजर राहावं असं समन्स बजावण्यात आलं आहे. विभव कुमार जर महिला आयोगासमोर हजर राहिले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. स्वाती मालिवाल यांच्या आईचं वक्तव्यही समोर आलं आहे. “माझी मुलगी स्वाती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र ही तिची लढाई आहे, माझी मुलगी या सगळ्या विषयावर योग्य वेळी भूमिका मांडेल.” असं त्यांच्या आईने म्हटलं आहे.
आपच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीबाबत भाजपाचे गौरव भाटिया म्हणाले, “याबाबतीत अरविंद केजरीवाल यांना यांनी उत्तर दिलं पाहिजे. पण ते काही बोलणार नाहीत कारण ते कायर आहेत. मला तर वाटतं आहे की केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. जे काही स्वाती मालिवाल यांच्याबाबत घडलं आहे त्यामुळे देशाच्या महिला वर्गामध्ये प्रचंड राग आहे. महिला हा स्वतःचा अपमान समजत आहेत. यासाठी फक्त केजरीवाल जबाबदार आहेत.”