१५ दिवसांत भारताच्या तिजोरीत ७६ हजार कोटीची भर

0

नवी दिल्ली – परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी वाढ झाली. गेल्या दोन आठवड्यात देशाच्या तिजोरीत ९ अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल ७६ हजार कोटी रुपये आले आहेत. ७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात ४.३०७ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ३६ हजार कोटी रुपयांची वाढ झाली. परकीय गंगाजळीत वाढ हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण मानले जात आहे. याचा परिणाम देशांतर्गत चलन मजबूत होण्यात होतो.

भारत आपली निर्यात वाढवत असल्याचे चित्र दिसत आहे. तर आयात मर्यादित करण्याची भारताची योजना आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत परकीय चलन साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या एका आठवड्यात, आपण परकीय चलन साठ्यात ४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ पाहिली आहे. परकीय चलन गंगाजळी सलग दोन आठवड्यांत ४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ आहे. ७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात ४.३०७ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ३६ हजार कोटी रुपयांची वाढ होऊन ६५५.८१७ अब्ज डॉलरचा नवा उच्चांक गाठला आहे. मागील आठवड्यात परकीय चलनाचा साठा ४.८३७ अब्ज डॉलर्स म्हणजेच ४० हजार कोटी रुपयांच्या वाढीसह ६५१.५१ अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता.

गेल्या दोन आठवड्यांबद्दल बोलायचे झाले तर देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात ९.१४ अब्ज डॉलर्स म्हणजेच ७६ हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे देशाचा परकीय चलनाचा साठा ६५० अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला असेच नाही, तर त्याहूनही पुढे गेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मधील भारताच्या राखीव ठेवी देखील १० दशलक्ष डॉलर्सनी वाढून ४.३३६ अब्ज डॉलर्स झाल्या असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech