सोलापूर : भोसे (ता. पंढरपूर) येथील दूध भेसळप्रकरणी आरोपी दत्तात्रय जाधवसह इतर आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत केली होती. त्यांच्या मागणीनुसार दूध भेसळ करणाऱ्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आता दूध भेसळ प्रकरणी मोका अंतर्गत कारवाईची सुरवात पंढरपुरातून होण्याची शक्यता आहे. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दूध भेसळ प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. वारंवार दूध भेसळ करून सर्वसामान्य लोकांच्या जिवास धोका निर्माण करणाऱ्या भेसळखोरांवर मोकांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी बनावट पनीरचा मुद्दाही पुढे आला होता.