मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटला ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. या प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे कोर्टात आव्हान देणार आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. कोर्टाने हा आक्षेप मान्य करत याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे. २९ जूनला या प्रकरणी पुढची सुनावणी होणार आहे.
शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) आपली भूमिका बदलून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक आरोपी नेत्यांना क्लीन चीट दिली आहे.२५ हजार कोटी रुपयांच्या कथित शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिलासा देताना कोणतेच पुरावे नसल्याचं म्हटलें होतं. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अजितदादांना सपत्नीक क्लीन चिट मिळाल्याने राजकीय वर्तुळातून त्याचे पडसाद उमटले होते.