अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांची तिसऱ्यांदा अवकाशात भरारी

0

वॉशिंग्टन- भारतीय वंशाच्या अमेरिकेतील अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी काल तिसऱ्यांदा अवकाशात भरारी घेत नवा इतिहास रचला. बोइंग स्टारलायनरच्या यानातून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (आयएसएस) पोहचणाऱ्या त्या पहिल्या महिला अंतराळवीर बनल्या. त्यांच्या या अवकाश भरारीचे जगभरात कौतुक होत आहे. बोइंग क्रू फ्लाइट टेस्ट या नावाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.

अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचवणे आणि परत पृथ्वीवर आणण्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या खासगी मानवी अंतराळ मोहिमांसाठी हे प्रक्षेपण म्हणजे यशाचा मोठा टप्पा गाठण्यासारखे आहे. ‘ए युनायटेड लाँच अलायन्स ॲटलास व्ही’ या प्रक्षेपकाच्या मदतीने यानाने फ्लोरिडातील केनेडी अवकाश केंद्रातून भारतीय वेळेनुसार काल ८ वाजून २२ मिनिटांनी उड्डाण केले. या यानात सुनीता विल्यम्स यांच्यासह बूच विल्मोर हे अंतराळवीर आहेत. याआधी ७ मे रोजी यानाच्या ऑक्सिजन व्हॉल्व्हमध्ये आणि १ जून रोजी तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण थांबविण्यात आले होते. दरम्यान, सुनिता विल्यम्स यांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा दिवस आहे. सुनिता विल्यम्स यांनी २००६- २००७ साली आणि २०१२ मध्ये सर्वाधिक स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर असल्याचा विक्रम केला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यांनी अवकाशात भरारी घेतली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech