मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी या महिन्यात होणा-या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेचे हे आमदार विधान परिषद सदस्यांमार्फत निवडले जाणार आहेत. त्यामध्ये महायुतीचे संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यानुसार भाजपाने पाच जणांना आपल्याकडून संधी दिली आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तसेच त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही २ जुलै आहे. तत्पूर्वी आज भाजपाकडून आपल्या विधान परिषद उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहेत. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांना विधान परिषदेसाठी संधी दिली गेली आहे. सोबतच विदर्भातून परिणय फुके तर पुण्यातून योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याबरोबरच महायुतीमधील मित्रपक्षांमधून सदाभाऊ खोत यांनाही भाजपाने संधी दिली आहे.
सध्याचे विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पाहायचे झाल्यास भाजपाचे १०३ आमदार आहेत. तर भाजपाचे महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्याशिवाय इतर छोटे पक्ष ९ आणि अपक्ष १३ असे एकूण २०१ आमदारांचे पाठबळ महायुतीकडे आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे ३७, ठाकरे गट १५ आणि शरद पवार गट १३ आणि शेकाप व अपक्ष प्रत्येकी एक असे मिळून ६७, असे बलाबल आहे. त्यामुळे सध्याच्या गणितानुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ आमदार निवडून येऊ शकतात. मात्र एखादा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरल्यास ही निवडणूक रंगतदार होऊ शकते.