मुंबई : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन उबाठाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले यावर शिक्कामोर्तब झाले, अशी सडकून टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. वक्फ बोर्ड विधेयकावरुन उबाठाचा नेतृत्वाचा वैचारिकदृष्ट्या गोंधळ उडाला असून त्यांचे भवितव्य अंधकारमय झाल्याची टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मुंबईत त्यांनी पत्रकारांकारांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उबाठाच्या वक्फ विरोधी बिलाच्या भूमिकेने बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांची मान शरमेने खाली गेली. त्यांच्या लोकप्रतिनिधींनी यावर खंत व्यक्त केली. कालचा दिवस उबाठासाठी दुर्देवी दिवस होता, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. वक्फ बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही, वक्फ बिलाला विरोध नाही तर भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे, असे ते म्हणतात. त्यांना काय बोलायचे काय निर्णय घ्यायचा हे सुचत नसल्याने उबाठा नेतृत्व वैचारिकदृष्ट्या गोंधळेल्या अवस्थेत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांची अवस्था ‘धरलं तर चावतय सोडलं तर पळतंय’ , अशी झाली असल्याचा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.
बाळासाहेबांनी नेहमीच देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमानांना पाठिंबा दिला आणि देशविरोधी मुस्लिमांना कायम विरोध केला. हीच भूमिका भारतीय जनता पार्टीने देखील घेतली, मात्र राहुल गांधींच्या सावलीत राहिल्याने उबाठाला वारंवार जिनांची आठवण येत आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आज त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे स्वत:ची अब्रू काढण्याचा प्रकार आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकामुळे मुठभर लोकांना वक्फ मालमत्तांची लूट करण्यापासून चाप बसेल आणि गरिब मुस्लिमांना त्याचा फायदा होईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. आम्ही या विचारांशी कदापी तडजोड करणार नाही. खुर्चीच्या मोहापायी २०१९ मध्ये जो अपराध केला त्याहून मोठा अपराध उबाठाने काल वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन केला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
UT म्हणजे यूज अँड थ्रो अर्थात वापरा आणि फेका!
UT म्हणजे यूज अँड थ्रो अर्थात वापरा आणि फेका असे म्हटले तर चालेल का, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. अडीच वर्ष सातत्याने टिका केली मात्र आपण टीकेला कामातून उत्तर दिले. टीका करणाऱ्यांना जनतेने निवडणुकीत खोक्यात बंद केले, असे ते म्हणाले. मला शांतपणे काम करु द्या, बोलण्यासारखे खूप आहे, बोलायला लावू नका, असा इशाराच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला दिला.