ठाणे: राज्यातील महिला व मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना येत्या एक जुलै 2024 पासून लागू करण्यात आली असून 21 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना दरमहा रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही गरजू महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. या योजनेची माहिती जिल्ह्यातील सर्व महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ग्राम/तालुकास्तरावर मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
राज्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली असून गुगल प्ले स्टोअर वरून ‘नारीशक्ती दूत’ नावाचे ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांना प्राधान्याने मदत करण्यासाठी तसेच या योजनेच्या लाभासंबंधीचे काही दाखले द्यावयाचे असल्यास आपले सरकार, ई-सेवा सेतू केंद्र, तहसिलदार कार्यालयांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कामात जी व्यक्ती किंवा संस्था टाळाटाळ/कुचराई करेल, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट ताकीद जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
या योजनेविषयी अधिक माहिती पुढीलप्रमाणे-
*योजनेचे स्वरुप :* पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.1,500/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रु.1,500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.
*योजनेचे लाभार्थी-* महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
*पात्रता निकष-* लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. या योजनेतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
*योजनेचा लाभ मिळण्यास अपात्रता :-* ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
*आवश्यक कागदपत्रे :-* योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. लाभार्थ्यांचे आधार कार्ड. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य). बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. पासपोर्ट आकाराचा फोटो. रेशनकार्ड. या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
*योजनेची कार्यपध्दती :- ऑनलाईन अर्ज-* पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड), स्वतःचे आधार कार्ड.
तात्पुरत्या यादीचे प्रकाशन, अर्ज प्राप्त झाल्यानंतर, तालुका स्तरावर छाननी करून पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/अॕपवर जाहीर केली जाईल, त्याची प्रत अंगणवाडी केंद्र/ ग्रामपंचायत/ वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल.
*लाभाच्या रक्कमेचे वितरण:-* प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) द्वारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल.
तरी जिल्ह्यातील गरजू माता-भगिनींनी जवळच्या अंगणवाडीस, तहसिल/पंचायत समिती कार्यालयास भेट देवून या योजनेविषयी अधिक माहिती घ्यावी. तसेच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.
0000000000