( खास प्रतिनिधी)
यवतमाळ – खासदार हेमंत पाटील आणि खासदार भावना गवळी यांनी आपल्या मतदार संघात चांगले काम केले आहे. भावना गवळी यांचा भाऊ म्हणून सांगतो त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळमधील सभेत दिली.
हिंगोली आणि यवतमाळममध्ये शिवसेना खासदारांनी चांगले काम केले आहे. या कामांमुळे यवतमाळ, हिंगोलीत महायुतीचे उमेदवार निवडून येतील यात शंका नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारने अनेक योजना बंद केल्या. कोरोनामध्ये अगोदरच्या सरकारने घातलेल्या सर्व बंदी आम्ही उठवून सगळे विकास प्रकल्प सुरू केले. आज शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळत आहेत. तरुणांसाठी नोकरभरती सुरू केली आहे. हे सरकार आपले, आहे असे सगळ्यांना वाटतेय. हे फेसबुक वर नाही तर फेस टू फेस काम करणारे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यवतमाळ वाशिम च्या मतदारांनी नेहमी शिवसेनेला साथ दिलेली आहे. भगव्याला साथ दिलेली आहे. बाळासाहेबांच्या विचाराला साथ दिलेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी लग्न एका बरोबर आणि संसार दुसऱ्या बरोबर, असे पाप केले. त्याच वेळेस आपल्यातील बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांच्या विचाराचा शिवसैनिक जागृत झाला आणि उठाव केला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.
—————–