पुणे : विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळाचा नारा देत 288 पैकी 125 जागा लढल्या मात्र मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम बाबत सातत्याने शंका उपस्थित करण्यात येत आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील यंदाच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा संशय आहे. त्यामुळे पुण्यातील बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम विरोधातील पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. बैठकीमध्ये पराभवाच्या कारणांबाबत चर्चा करण्यात आली.
राज ठाकरे यांनी देखील ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पराभूत उमेदवारांना आणि पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम संदर्भातील पुरावे गोळा करण्याच्या सूचना देण्यात आला आहेराज ठाकरे यांच्याकडून राज्यभरात झालेल्या निवडणुकांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याच दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्रातील ही आढावा बैठक होती. बैठकीनंतर मनसे नेते बाबू वागस्कर यांनी बैठकीबाबतची माहिती माध्यमांना दिली बाबू वागस्कर म्हणाले, आज झालेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला यादरम्यान अनेक उमेदवारांनी ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली. आगामी निवडणुकांमध्ये मनसे जोमाने लढणार असल्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आलं. काही उमेदवारांनी मतमोजणी मध्ये देखील फेरफार झाली असल्याचा आक्षेप घेतला आहे. संदर्भातील निवडणुकीदरम्यान आलेले सर्व अनुभव पराभूत उमेदवारांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडले.