सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची संवर्धनाची कामे पुरातत्त्व विभाग व संबंधित कंत्राटदारांनी वेळेत पूर्ण करावीत. कामे गुणवत्तापूर्ण करावीत. कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तत्काळ निधी शासनस्तरावरुन उपलब्ध करून देण्यात येईल, असे राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.मंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. यानंतर ते बोलत होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सदर कामांची पाहणी केली. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. मंत्री महाजन म्हणाले की, पुरातत्त्व विभाग व संबंधित कंत्राटदारांनी सदर कामास गती देऊन ती वेळेत व गुणवत्तापूर्ण करावीत. सुरू असलेल्या कामांच्या उपलब्ध निधीची माहिती घेतली. उपलब्ध निधीची कमतरता भासल्यास तात्काळ निधीची उपलब्धता शासनस्तरावरुन येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले