नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर शनिवारी होणा-या मतदानोत्तर चाचणीच्या (एक्झीट पोल) अनुमानावर होणा-या चर्चांमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होणार नाहीत. या संदर्भात काँग्रेसच्या माध्यमे व प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान शनिवारी सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. यानंतर विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल दाखविले जाणार आहेत. पवन खेडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदारांनी मत दिलेले आहेत. ईव्हीएममध्ये मतदारांचा कौल बंद झालेला आहे. येत्या चार जूनला मतदारांचा कौल सर्वांपुढे येणारच आहे. केवळ टीआरपी वाढविण्यासाठी होणा-या या निरर्थक चर्चांच्या खेळात सहभागी होण्याचे कोणतेही औचित्य नसल्याची भूमिका काँग्रेसची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही चर्चेचा उद्देश हा दर्शकांचे ज्ञानवर्धन करण्याचा असतो. या चर्चांमध्ये तसे काहीही होत नाही, मात्र येत्या चार जून रोजी निकालाच्या दिवशी काँग्रेसचे प्रतिनिधी होणा-या चर्चांमध्ये सहभागी होतील, असेही पवन खेडा यांनी स्पष्ट केले आहे.