अमरावती – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हरियाणातील जनतेने तिसऱ्यांदा राज्याची सूत्र ही भाजपच्या हातात दिली आहेत. आताताई काँग्रेसनं विजयापूर्वी जिलेब्या तळल्या होत्या, मात्र जनतेने त्यात पाक भरला नाही अशी टीका देखील भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी केली आहे. बोंडे यांच्या नेतृत्वात हरियाणातील भाजपच्या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष मंगळवारी (ता.८) भाजपा तर्फे येथील जयस्तंभ चौकात करण्यात आला.
दरम्यान भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके उडवत, मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा अभूतपूर्व विजय मिळवला. त्यानिमित्त राज्यसभा खासदार तथा भाजपा नेते अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्शीच्या जयस्तंभ चौकात भारतीय जनता पार्टीने मोठा विजयोत्सव साजरा केला. फटाके, गुलालांची उधळण ढोल ताशांची आतषबाजी करत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नृत्यावर थीरकत हा आनंदोत्सव साजरा केला. हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान बोलताना अनिल बोंडे म्हणाले, हरियाणात भाजपचा दणदणीत विजय झाला. ४९ जागांवर भाजपने आघाडी घेतली. तिसऱ्यांदा येथे भाजपचे सरकार स्थापन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर हरियाणातील जनतेने विश्वास ठेवला. त्यामुळे आता न भूतो न भविष्यती येथील विकास झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी डॉ. वसुधा बोंडे, अर्चना मुरुमकर, अमित कुबड़े, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश शिरभाते, दत्ता गेडाम, राहुल चौधरी, रवी मेटकर, अजय आगरकर, अशोक देशमुख, राजेश्वर निस्ताने, नितिन उमाळे, हर्षल चौधरी, मनोज मोकळकर, आप्पा गेडाम, हरीविजय गेडाम, रावसाहेब अढ़ाऊ, नितिन चिखले, बाबाराव जाधव, उमेश जवंजाळ अनिता लांजेवार, प्रतिभा राऊत, विद्या गेडाम, संगीता तायडे, माया वानखडे, माया बसुंदे, भारती महाजन, सुनिल ढोले, ज्योती मालवीय यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी या विजयी जल्लोषात सहभागी झाले होते.
वरुड-मोर्शीत कमळ फुलेल : डॉ.अनिल बोंडे भाजपने जयस्तंभ चौकात मोठा जल्लोष साजरा केला. हरियाणातील विजयाचा महाराष्ट्रात आनंद साजरा होत आहे. हरियाणात जे झालं तेच महाराष्ट्रात होईल. कमळाचा विजय होईल. अस म्हणत डॉ. अनिल बोंडे यांनी वरुड-मोर्शी विधानसभा क्षेत्रातही कमळ फुलणार असल्याचेही जाहीर केले.