कीटकनाशक खरेदीत २०.६७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार – नाना पटोले

0

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळातील कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी नाही तर अधिकारी व मंत्री यांचे खिसे भरण्यासाठीच काम करत होता असे विविध घोटाळ्यांवरून दिसत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवल्या जाणाऱ्या कीटकनाशक खरेदीतही गैरव्यवहार करण्यात आला आहे. २५.१२ कोटी रुपयांच्या खरेदीत २०.६७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराशी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. कृषी विभागातील आणखी एक घोटाळा उघड करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारची पोलखोल केली आहे.

कीटकनाशक खरेदीतील घोटाळा कसा करण्यात आला हे सांगताना पटोले म्हणाले की, कृषी उद्योग महामंडळाने कीटकनाशक पुरवठ्यासाठी दिनांक १६/३/२०२४ रोजी २५.१२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले. यासंदर्भतील खरेदी प्रक्रिया ही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच करण्यात आली. ऑनलाईन पोर्टलवर PI Industries चे Metaldehyde कीटकनाशक २२५ रुपये किलो प्रमाणे उपलब्ध असताना निविदेत आलेल्या १२७५ रुपये किलोच्या दराने शासनास पुरवठा करण्यात आला. म्हणजे १०५० रुपये प्रति किलो जादा दराने १ लाख ९६ हजार ९४१ किलो कीटकनाशक खरेदी करून २० कोटी ६७ लाख ८८ हजार ५० रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला.

Metaldehyde निविदेत ४ निविदाधारकांनी भाग घेतला असता तिघांना पात्र ठरवण्यात आले व एकाला अपात्र ठरवले. पात्र ठरवण्यात आलेल्या ३ निवीदाधारका पैकी दोघांची वार्षिक उलाढाल निविदेत अनिवार्य असलेले १० कोटी रुपयांपेक्षा कमी होते, तसेच त्यांच्याकडे अनिवार्य असलेले पुणे आयुक्त कार्यालयाचे पेस्टीसाईड विक्री परवाना नव्हता, वरील त्रुटी असतांना सुद्धा त्या दोन निवीदाधारकाला महामंडळातील अधिका-यांनी निविदाधारकाशी संगनमत करून त्या अपात्र होणा-या निवीदाधारकांना पात्र करण्यात आले, दोघांना अपात्र केले असता एकच निवीदाधारक पात्र ठरला असता व फेर निविदा करावी लागली असती.

या निविदेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संपूर्ण व्यवहाराशी संबंधित तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी वैभव पवार, कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोंदावले, पेस्टीसाईड व लेखा व वित्त विभागाचे महाव्यवस्थापक सुजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयएल विजय पाथरकर व उपमुख्यव्यवस्थापक पेस्टीसाईड देवानंद दुथडे यांची चौकशी करून कारवाई करावी. कृषी विभागातील घोटाळ्यावर सरकार गप्प आहे पण शेतकऱ्यांच्या नावावर खिसे भरणाऱ्यांना भ्रष्टाचाऱ्यांना काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech