पाण्यासाठी मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण बसले आयुक्तांच्या दारात

0

टँकर माफियांसाठीच कृत्रिम पाणीटंचाई; दहा हजार नागरिकांसह आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढणार – शानू पठाण

ठाणे – ठाणे, मुंब्रा – कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त झालेले मा. विरोधीपक्ष नेते अश्रफ (शानू) पठाण यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनासमोरच आंदोलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच गोंधळ माजला होता.

धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा , कौसा परिसरात गेले चार दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत. त्याविरोधात शानू पठाण हे आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी ठाणे महानगर पालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या धरून बसले. त्यामुळे पालिका मुख्यालयात गोंधळ माजला होता. शानू पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी पठाण म्हणाले की, ठाणे शहरात 10 टक्के पाणी कपात करण्यात आली असली तर 90% पाणीपुरवठा केला जात नाही. गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येणार नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुंब्रा – कौसा भागातील नागरिकांना गेल्या तीन दिवसात सुमारे पन्नास लाख रूपयांचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. ठामपाचे काही अधिकारी टँकर लाॅबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत. टँकर लाॅबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानेच नागरिकांना छळले जात असून जर येत्या सोमवारपर्यत जर पाणीपुवठा नियमित केला नाही तर पालिका आयुक्तांच्या घरासमोर दहा हजार नागरिकांसह आंदोलनाला बसू, असा इशाराही पठाण यांनी दिला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech