श्रीनगर : वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिमांच्या विरोधात नाही. या विधेयकावरून अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली जातेय. सरकार किंवा कोणतीही व्यक्ती वक्फ मालमत्तेशी छेडछाड करू शकत नाही, असे अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज, शनिवारी सांगितले. जम्मू-काश्मीर दौर्यावर असलेले रिजिजू म्हणाले की, जगात सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात आहेत. देशात अनेक मुस्लिम कुटुंब श्रीमंत नाहीत. त्यांनाही वक्फ मालमत्तेचा लाभ मिळाला पाहिजे, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे, असे काही लोक दिशाभूल करत आहेत. आपला देश कायदा, संविधान आणि व्यवस्थेवर चालतो. सरकार किंवा कोणतीही व्यक्ती वक्फ मालमत्तेबरोबर हस्तक्षेप करु शकत नाही.श्रीनगरमधील हजरतबल तीर्थक्षेत्र जगभर प्रसिद्ध आहे. जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाने हजरतबल तीर्थक्षेत्राचे नूतनीकरण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा मला खूप आनंद आहे. राज्यांच्या वक्फ बोर्डाला पाठिंबा देणे ही माझी जबाबदारी आहे आम्ही जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाला पाठिंबा देऊ. सूफी तीर्थक्षेत्रे प्रेमाचा संदेश देतात. आम्ही अशा आणखी स्थळांचा विकास करू, असेही रिजिजू यांनी स्पष्ट केले.