दोन्ही सैन्याच्या फ्लॅग मिटींगमध्ये झाला निर्णय
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनांवर चर्चा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने शुक्रवारी चक्कन-दा-बाग क्रॉसिंग पॉइंट परिसरात फ्लॅग मिटींग घेतली. सुमारे ७५ मिनिटे चाललेली ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. सीमेवरील शांततेच्या व्यापक हितासाठी दोन्ही बाजूंनी युद्धबंदीच्या समझोत्याचा आदर करण्याचे मान्य केले.
भारत आणि पाकिस्तानात २५ फेब्रुवारी २०२१ रोजी युद्धबंदी कराराचे नूतनीकरण झाल्यानंतर, अलीकडेच जम्मू आणि काश्मीर सीमेवर अनेक सीसफायरची उल्लंघने झाली आहेत. या महिन्याच्या ११ तारखेला, जम्मू प्रदेशातील अखनूर सेक्टरमध्ये संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) हल्ल्यात एका कॅप्टनसह भारतीय सैन्याच्या २ जवानांना हौतात्म्य आले आणि एक जखमी झाला. त्याचप्रमाणे, १० आणि १४ फेब्रुवारी रोजी राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून लहान शस्त्रांनी केलेल्या गोळीबाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये लष्कराचे २ जवान जखमी झाले. गेल्या आठवड्यात, पूंछमध्ये वेगवेगळ्या भूसुरुंग स्फोटांमध्ये आणखी २ लष्करी जवान जखमी झाले. पाकिस्तानने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत किती नुकसान झाले हे त्वरित कळू शकले नाही, परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की शत्रू सैन्याचेही मोठे नुकसान झाले आहे.