भारतीय संविधान हे शतकानुशतके देशाला मार्ग दाखविणारे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया भारतीय संविधानाने घातला. संविधानाने भारतीय संस्कृतीचे आणि देशाचे उज्वल भवितव्य सुनिश्चित केले. अब्जावधी भारतीयांच्या स्वप्नांना बळकटी दिली. गेली ७५ वर्ष अविरतपणे देशाला मार्ग दाखवण्याचे काम संविधानाने केले आहे आणि पुढे शतकानुशतके करत राहणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केले. भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या विषयावर विधानपरिषदेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विचार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, प्रत्येक जण सन्मानाने आणि न्यायाने जगू शकेल याची खात्री संविधानाने दिली. स्त्री-पुरुषांना समान अधिकार संविधानाने मिळवून दिला. म्हणूनच आज महिला मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा उच्चपदांवर पोहोचू शकल्या. त्यामुळे संविधान हा केवळ कायदा नाही तर ती लोकशाहीची सनद आहे. भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती प्रत्येक भारतीयांने सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. भारताचा स्वातंत्र्यलढा महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि असंख्य ज्ञात, अज्ञात वीरांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. त्यातून अखेर देश स्वतंत्र झाला आणि पुढे संविधानापर्यंत पोहोचला, असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्यशासन जनतेच्या भल्यासाठी काम करताना संविधानाचे सगळे मानदंड पाळत आहे. सुशासन, लेक लाडकी, लाडकी बहीण सारख्या लोकहिताच्या योजना, सारथी, बार्टी, आर्टी, महाज्योती सारख्या संस्था, शेतकऱ्यांसाठीच्या कृषी सुधारणा योजना, संविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्वाला पुढे नेण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, शेती, महिला सक्षमीकरण, आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांत ठोस काम करून संविधानाचे तत्व पाळले जात आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून हे इंजिन वेगाने धावण्यासाठी जी ऊर्जा लागते केवळ आर्थिक नसून, संविधानाच्या तत्वांतून येते आणि पुढेही येत राहील, असे मत उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी दिलेले संविधान कधीही कालबाह्य होणार नाही. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या अहवालानुसार, त्या विद्यापीठातून २०० वर्षांत शिकून गेलेल्या विद्वान विद्यार्थ्यांपैकी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभरण्यात आला. त्याखाली ’द सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणजे ‘ज्ञानाचे प्रतीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे लिहिले आहे. अशा ज्ञानसंपन्न, महान विद्वानाने भारतीय संविधान तयार केले, हे आपल्या देशाचे भाग्य आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कलम ३७० हटवण्याचा धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, संविधानाचा ७५ वर्षांचा हा प्रवास अभिमानास्पद आहे आणि भारताच्या प्राचीन लोकशाही वारशाचा हा उत्सव आहे. याच पवित्र संविधानाच्या प्रकाशात आपण पुढे मार्गक्रमण करत लोकशाही अधिकाधिक बळकट करत राहू हा विश्वास आहे. संविधानाचे पावित्र्य आणि महत्त्व पुढल्या पिढ्यांनाही प्रेरक ठरावे यासाठीच प्रत्येक तालुक्यात संविधान भवन साकारले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech