लोकलमध्ये सीटच्या वादातून प्रवाशाची हत्या

0

कल्याण : लोकल प्रवासात बसण्याच्या सीटच्या वादातून प्रवाशाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. अंकुश भालेराव असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तसेच मोहम्मद सनाउल्लाह सोहेल बैठाला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टिटवाळा येथे राहणाऱया अंकुश भालेराव यांनी 14 नोव्हेंबरला घाटकोपर येथे जाण्यासाठी लोकल पकडली. त्या लोकलच्या डब्यात अल्पवयीन मुलगा प्रवास करत होता. सीटवर बसण्यावरून वाद झाला. अंकुशसह दोन प्रवाशांनी त्या मुलाला मारहाण केली. मारहाण केल्यावर अल्पवयीन मुलाने धमकी दिली. 15 नोव्हेंबरला अंकुशने नेहमीप्रमाणे टिटवाळा येथून घाटकोपरसाठी लोकल पकडली. अंकुश हे घाटकोपर येथे उतरले. त्यानंतर अल्पवयीन मुलाने बॅगेतून चाकू काढून हल्ला केला. त्यात अंकुश जखमी झाले. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी तपासाच्या सूचना दिल्या. एसटीएफचे वरिष्ठ निरीक्षक विजय खेडकर, गुन्हे शाखेचे रोहित सावंत, सहाय्यक निरीक्षक भूपेंद्र टेलर, कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी यादव, प्रशांत सावंत आदींच्या पथकाने गुन्हेगाराला अटक केली.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून गोवंडी येथून पोलिसांनी मोहम्मद बैठाला ताब्यात घेतले. हल्ला केल्यानंतर अल्पवयीन मुलगा बैठाच्या घरी गेला होता. त्याने हत्येसाठी वापरलेले शस्त्र हे घराच्या पत्र्यावर लपवले होते. पोलिसांनी ओळखू नये यासाठी त्याने केस कापले होते. हत्येच्या गुह्यात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालगृहात केली. तर बैठाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech