राज ठाकरेंचे उपद्रव मूल्य

0

नितीन सावंत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळीच राजकीय चाल खेळली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर महाविकास आघाडीने वाढीव सात लाख मतांना आक्षेप घेतला. परंतु त्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी फारसे लक्ष दिले नाही. मात्र राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यात आपल्याला मिळालेली मते गेली कुठे ?असा सवाल करताच भाजपच्या तंबूमध्ये घबराट पसरली. महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरे सुद्धा याबाबत प्रश्न उपस्थित करत असतील तर आगामी नाशिक, पुणे आणि मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका आपल्याला जड जातील याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आली. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्यासोबत नाश्ता करण्याची उपरती फडणवीस यांना आली.

विधानसभा निवडणुकीतील संध्याकाळी सहा नंतर वाढीव मतांचा मुद्दा सध्या फार गाजतो आहे. या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत निवडणूक आयोगावर टीका केली. विशेष म्हणजे निवडणुका आयोग हा सत्ताधारी पक्षाच्या मर्जीवर चालत आहे हे काही लपून राहिलेले नाही. महाराष्ट्रात तरी निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय हे भाजपच्या सांगण्यानुसार घेतले आहेत हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी देणे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ ही निशाणी देणे हे निर्णय मेरीटवर झालेले नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेलाही पटले आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका दिला. मात्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी सहा नंतर झालेले वाढीव मतदान महायुतीच्या कामी आले, अशी चर्चा आहे. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर अशा चर्चाना काही अर्थ उरत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांची भेट घेऊन अनेकांना संदेश द्यायचे होते. हे संदेश त्या पक्षांपर्यंत पोहोचले आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उद्देशाने उद्धव ठाकरे यांच्या सेनेला त्यांनी पहिला संदेश पाठवला. त्यानंतर आपले सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या भेटीतून संदेश मिळाला आहे. महाशक्तीचे गोडवे गाणाऱ्या एकनाथ शिंदे यांना चांगले धडे मिळाले आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी व्यवस्थित एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि मंत्र्यांचा कार्यक्रम सुरू केला आहे. एस टी महामंडळाचे अध्यक्षपद शिंदे यांच्या शिवसेनेकडे असताना त्यांनी संजय सेठी या आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांना प्रथम गप्प बसवले आहे. त्याचबरोबर शिंदे सेनेकडे जी खाती आहेत त्या खात्यांच्या सचिवांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. उदय सामंत उद्योग मंत्री असताना एमआयडीसीमध्ये आता परस्पर निर्णय घेतले जात आहेत.

त्यामुळे माध्यमांकडे जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही. परंतु मुख्यमंत्री हे सर्वेसर्वा असतात. कोणताही आयएएस अधिकारी हा त्यांच्या शब्दाबाहेर नसतो. ही तर प्रातिनिधीक उदाहरणे झाली. शिंदे सेनेचे सर्वच मंत्री या दुःखाने पछाडलेले आहेत. त्याचबरोबर नगर विकास मंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी या खात्याच्या महत्त्वाच्या फाइल्स मुख्यमंत्र्यांमार्फतच जातात. पूर्वी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे नगर विकास खाते होते मात्र या विभागाचे निर्णय संवेदनशील असल्याने या फाइल्स मुख्यमंत्र्यामार्फतच विभागाकडे जातात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील नगर विकास विभागाच्या महत्त्वाच्या फाइल्स त्यांच्यामार्फतच विभागात जात असत. एकनाथ शिंदे यांच्या अनेक अर्थपूर्ण फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयाकडे पेंडिंग आहेत. त्यामुळे ते नाराज आहेत. यापूर्वी बंगले वाटपावरूनही एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु या नाराजीस मुख्यमंत्र्यांनी भीक घातली नाही. आता तर राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांना थेट संदेशच दिला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघावरून शिंदेसेना आणि मनसे यांच्यातील दरी वाढली होती. या भेटीनंतर ही दरी अधिक रुंदावणार आहे.

या भेटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत तर अधिक अस्वस्थता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक हे सरकारने ताब्यात घ्यावे ही राज ठाकरे यांची प्रमुख मागणी आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या नावाखाली महापौर बंगला उद्धव ठाकरे यांना हडप करायचा आहे, असा स्पष्ट आरोप राज ठाकरे यांनी यापूर्वी केला होता. त्यामुळे या भेटीत त्यावरही प्रामुख्याने चर्चा झाली असावी. आपल्या मुलाला विधान परिषद घेण्यापेक्षा राज ठाकरे शिवसेनाप्रमुख यांचे स्मारक सरकारने ताबा ताब्यात घेण्यास अधिक प्राधान्य देतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अधिक अस्वस्थता आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता भविष्यात भाजप आणि मनसे आघाडी होईल का? हा महत्त्वाचा मुद्दा राहिलेला नाही तर राज ठाकरे यांचे उपद्रव मूल्य कमी करण्यासाठी फडणवीस यांनी ही भेट घेतल्याचे स्पष्ट होते.

नितीन सावंत, ९८९२५१४१२४

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech