रत्नागिरी : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाराज राजन साळवी भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र त्यांनी शिंदे गटाची कास धरण्याचा निर्णय घेतला आहे. गेले काही दिवस शिवसेना ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा असलेले साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते उद्या, गुरुवारी दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोकणात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी आमदार राजन साळवी यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार, आता उपनेता अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे साळवी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यास कोकणात महायुतीची ताकद वाढणार आहे. माजी आमदार राजन साळवी यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता असून त्यांना तसा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे.