ठाणे : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी साळवी म्हणाले की, ९ तारीख म्हणजे भाईंच्या जन्मदिवस आणि माझा वाढदिवस देखील ९ तारखेलाच असतो. भाईंना भेटलो तेव्हा एक छोटा भाऊ मागे राहिला आहे, मला परिवारात घ्या, अशी विनंती केली. मी स्वतःला भाग्यवान समजतो, आनंद दिघे यांच्या पदस्पर्शाने ही जागा पवित्र झाली, तिथेच माझा शिवसेनेत प्रवेश होतोय. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी जिल्हाप्रमुख झालो आणि शिवसेनेत काम केले. माझ्या एका डोळ्यात आज अश्रू आहेत. एक डोळ्यात दु:खाश्रू आहे, तो पक्ष सोडून नवीन प्रवाहात येतोय म्हणून दु:खाश्रू आहेत. खरं तर कुटुंबातला सदस्य म्हणून भाईंनी माझ्यावर प्रेम केलंय. भाई मुख्यमंत्री होत असताना त्यांच्यासोबत जाऊ शकलो नाही, याचं दुःख आहे.
प्रवेशानंतर शिंदे म्हणाले की, एकनाथ शिंदे जहाँ खडा होता है, वही से लाइन सुरू होती है. उद्यापासून तुम्हाला आम्हाला जशा पदव्या दिल्या, तशा तुम्हाला पण देतील, असं म्हणत एक डायलॉग आहे की, आधें इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ, पण मागे वळून बघितलं कोणीच नाही, असा टोलाही शिंदेंनी लगावलाय. भगवामय कोकण झाला पाहिजे, कारण बाळासाहेबांचं प्रेम कोकणावर होतं. मैं अकेला चलता गया, पीछे लोग आते गये कारवा बनाता गया. ज्यांनी मला ओळखलं नाही, ज्यांना समजलं नाही, त्यांनी आता ओळखलं असेल. कोकणात समृद्धी आणायची आहे. आपण प्रकल्प बनवायचे आहेत. मी मनापासून राजन साळवी यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हापासून वाटत होतं राजन साळवी सोबत हवा होता, पण तेव्हा काही हुकलं, चुकलं. राज्यात शिवसेना सगळीकडे पाहिजे. कार्यालयात अन् घरी बसून फेसबुक लाइव्ह करून कामं होत नाहीत. सगळ्या मंत्र्यांना मी सांगितलं आहे फील्डवर जा. तसेच लाडकी बहीण योजना आणि कोणतीही योजना बंद होणार नसल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. राजन साळवींनी काल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. शिवसेनेत २०२२ ला मोठी फूट पडली. त्यावेळी राजन साळवी उद्धव ठाकरेंबरोबरच होते; मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदे आपले राजकीय गुरू आहेत असे म्हणत हाती धनुष्य-बाण घेतले आहे.
राजन साळवी राजापूरचे तीन वेळा आमदार होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९३ ते ९४ च्या सुमारास ते शिवसेनेत सक्रिय झाले. त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे रत्नागिरीचे नगराध्यक्षपद भूषवले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान राखलेल्या मोजक्या आमदारांमध्ये राजन साळवी यांचा समावेश होता. मविआ सरकारची सत्ता गेल्यानंतर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा लागला होता. तरीही राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेटाने उभे राहिले होते; मात्र, विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे साळवी नाराज होते. यावरून ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस सुरू होती. त्या सगळ्या कोंडीमुळे अखेर साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू राजापूरचे आमदार किरण सामंत उपस्थित होते.