हनुमान टेकडी येथील सोसायटीत ज्येष्ठ नागरिकांनी प्रथमच जल्लोषात साजरी केली शिवजयंती

0

मराठी जनतेचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती सर्वत्र उत्साहात व जल्लोषात पार पडली.

मुंबई : अशोकवन,दहिसर (पूर्व) येथील, हनुमान टेकडी स्थित शेठ मीडोरी गृह संकुलात प्रथमच साजरी झालेली शिवजयंती ही विशेष होती. विशेष एवढ्यासाठीच की याची सर्व जबाबदारी या गृह-संकुलातील सुगंधी कट्ट्यावरील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ सदस्यांनी घेतली व ती लिलया पार पाडली. यामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा उद्देश असा होता की, या संकुलातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शौर्य, पराक्रम याची जाणीव करून देणे. याचाच एक भाग म्हणून दिनांक ९ मार्च रोजी ज्युनिअर के.जी. ते सातवीतील विद्यार्थ्यांना किल्ल्यांचे रेखाचित्र रंगविण्यासाठी सहभाग घेण्यास उद्युक्त करण्यात आले व त्यास फार मोठा प्रतिसाद लाभला.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी तर सर्वच ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रथम सकाळी ९.३० वाजता महाराजांच्या अर्धपुतळ्याचे संस्थेतील जेष्ठ महिलांनी औक्षण करून आरती केली व पुष्पहार अर्पण केला. दुसरे सत्र सायंकाळी ६.३० वाजता सुरू झाले आणि रात्रीचे १०.३० कधी वाजले हे समजलेच नाही. सुमारे चार तास छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, शौर्य, पराक्रम, वीरश्री इ.बाबत माहिती, भाषणे, शौर्य-गीते, पोवाडे विविध वयोगटातील ( दोन वर्षे ते ७५ वर्षे) मुले/व्यक्ती यांनी खूप सुंदर सादरीकरण केले. लहान मुले/मुली/महिला ज्येष्ठ व्यक्ती यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे यांच्या वेशभूषा केल्या होत्या. या कार्यक्रमाचा संकुलातील सुमारे ३०० ते ३५० सभासदांनी आनंद घेतला. रेखाचित्र रंगवणे, कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना यथोचित बक्षिसे प्रदान करण्यात आली.

शेवटी महिलांच्या लेझीम पथकात व महाराजांच्या गगनभेदी घोषणांमध्ये फुलांनी सजविलेल्या पालखीत संस्थेच्या सभोवताली मिरवणूक काढून या अतिशय नियोजनबध्द व रंगतदार सोहळ्याची सांगता झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या या पहिल्याच प्रयत्नांस अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद सोसायटीच्या सभासदांनी दिलात्याबद्दल मन:पूर्वक आभार मानण्यात आले. या सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल सुगंधी कट्टा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने त्यांचेही आभार मानण्यात आले. अशा रीतीने ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः घेतलेल्या संधींचे सोने करून आम्ही म्हातारे नसून महा-तारे आहोत हे यानिमित्ताने सिद्ध केले असल्याचे रमेश शिरवटकर यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech