सॅनफ्रॅन्सिस्को – इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टेस्ला कंपनीची रोबोटॅक्सी लवकरच बाजारात येणार आहे. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपल्या समाजमाध्यमावर ही माहिती दिली. आपल्या समाजमाध्यम अकांऊट वर त्यांनी लिहिले आहे की टेस्लाच्या रोबोटॅक्सीचे उद्घाटन झाले असून ती येत्या ८ ऑगस्टला बाजारात येणार आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी इतर कोणतेही तपशील दिलेले नाहीत.
एलॉन मस्क यांची ही पोस्ट समाजमाध्यमांवर आल्याबरोबर टेस्लाचे शेअर्स ३ टक्क्यांनी वधारले. मस्क यांनी अनेक दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती, की टेस्ला स्वयंचलित रोबोटॅक्सीवर काम करत आहे. मार्च महिन्यात त्यांनी टाकलेल्या पोस्ट मध्ये म्हटले होते की, टेस्लाचे एफएसडी मॉडेल हे सुपरह्युमन असून त्यामध्ये अनेक नवे फिचर्स आहेत. जे आताच्या कारमध्ये असणे शक्यही नाही. तुम्ही फार थकलेले असाल किंवा अगदी मद्य घेतलेले असेल तरीही तुम्ही आरामात प्रवास करू शकता. टेस्लाची ही कार घेणाऱ्यांना पैसेही कमावता येणार आहेत. ही कार केवळ पार्किंगमध्ये उभी करण्यापेक्षा ती रोबोटॅक्सीच्या व्यवसायासाठीही वापरता येईल. सॅनफ्रॅन्सिस्कोच्या रस्त्यांवर सध्या चालक विरहित वाहनांची चाचणी सुरू आहे. या चालकविरहित वाहनांनाअनेकांचा विरोध आहे. टेस्लाच्या ऑटोपायलट फिचरवरही आक्षेप घेण्यात आले आहेत.