मुंबई – लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल सर्वांसाठीच आश्चर्यकारक ठरले. ‘अब की बार ४०० पार’चा नारा देणाऱ्या एनडीएसाठी ‘उत्तर प्रदेश’ सर्वात मोठा धक्का ठरला. याठिकाणी अयोध्येतील श्रीराम मंदिर ज्या मतदारसंघामध्ये येतं त्या फैजाबादकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र याठिकाणी भाजपचे लल्लू सिंह पराभूत झाले आणि त्याठिकाणी समाजवादी पार्टीते उमेदवार अवधेश प्रसाद यांनी बाजी मारली. यानंतर अयोध्येतील नागरिकांनी भाजपला मत न दिल्याबद्दल अनेकांनी टीका केली आहे. यामध्ये आता रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत ‘लक्ष्मण’ ही भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांचेही नाव जोडले गेले आहे. सुनील यांनी इन्स्टाग्राम स्टोरीसह एक व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली.
सुनील यांनी शेअर केलेल्या स्टोरीमध्ये असे लिहिले की, ‘आपण हे कसे विसरलो की हे तेच अयोध्यावासी आहेत, ज्यांनी वनवासाहून परतल्यानंतर सीतामातेवर संशय व्यक्त केला होता. देव स्वत: जरी प्रकटले तरी हिंदू त्यांना नाकारतील… स्वार्थी… इतिहास साक्षीदार आहे की अयोध्येतील नागरिकांनी नेहमीच त्यांच्या खऱ्या राजाचा विश्वासघात केला आहे.’
त्यांनी आणखी एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले की, ‘मी अयोध्येतील प्रिय नागरिकांच्या महानतेला सलाम करतो, तुम्ही तर सीता मातेलाही सोडलं नव्हतं हो… तर मग प्रभू रामांना छोट्या तंबूमधून बाहेर काढून भव्य मंदिरात विराजमान करणाऱ्याला धोका देणे ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम, संपूर्ण भारत देश तुमच्याकडे कधी सन्मानाने पाहणार नाही.’