गुन्हा दाखल असतानाही वाल्मिक कराडवर ईडीने कारवाई का केली नाही? – सुप्रिया सुळे

0

मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एक महिना पूर्ण झाला आहे.या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक झाली असून त्याच्यावर खंडणी अंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे.अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणातील आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक वेगळाच मुद्दा उचलून धरला आहे. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारसह तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, “बीड आणि परभणीतील घटनेवर आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. संसदेत कोणी आवाज उठवला तर बजरंग अप्पा सोनावणे यांनी उठवला. सभागृहात मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी कामकाज सोडून प्रत्यक्ष तिथे गेले. परभणी आणि बीड मधील प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी दिली पाहिजे, अशी मागणी केली. विधीमंडळात संदीप क्षीरसागर यांनी तो मुद्दा मांडला. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुरेश धस, नमिता मुंदडा यांनी हा विषय मांडला. अंजली दमानिया यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले काही प्रश्नांची उत्तरे मिळाली.”

वाल्मिक कराडवर आधीच खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल होता. खंडणी विरोधात पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. मग वाल्मिक कराड प्रकरणी ईडी आणि पीएमएलएची अंमलबजावणी का करण्यात आली नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला विचारला. अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर ऐकीव गोष्टीच्या आधारावर कारवाई होते तर मग कंपनीची तक्रार असताना वाल्मिक कराडवर गुन्हा असताना त्यांच्यावर कारवाई का नाही? तसेच खंडणी प्रकरणी कंपनीने मे महिन्यात नोटीस पाठवली होती. त्यामुळे वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असतानाही ईडीने कारवाई का केली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. यावेळी त्यांनी वाल्मिक कराड विरोधातील सर्व एफआयआरची प्रत देखील माध्यमांना दाखवली.

“या प्रकरणात मी आणि खासदार बजरंग बाप्पा अर्थ मंत्र्यांना ईडी कारवाईबाबतही पत्र लिहिणार आहोत. ही अशी खंडणी उकळली जात असेल तर कंपन्या गुंतवणूक कशी करणार? लाडकी बहीण योजनेचे परळी तालुक्यातील कमिटीचे अध्यक्ष आजही वाल्मिक कराड आहेत. लोकसभेच्या आधीच वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा होता. खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीला परळी तालुक्यातील लाडकी बहीण योजनेचा समितीचा अध्यक्ष का केला? वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट का? जर कारवाई झाली असती तर संतोष देशमुख वाचले असते,” असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech