लंडन- कोरोनावरील लशीचे दुष्परिणाम होऊ शकतात अशी चर्चा कोरोना महामारीच्या काळात जगभर मोठ्या प्रमाणात झाली. त्यातून बराच वादंग माजला होता. कोरोनाची लस घेतल्यानंतर काहीना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र दुष्परिणाम होऊ शकतात हे कुणी मान्य करायलाच तयार नव्हते. मात्र आता ॲस्ट्राजेनेका कोरोना लसीबाबत एक धक्कादायक खुलासा आला आहे. या लसीमुळे टीटीएस म्हणजे रक्तात गुठळ्या होणे हा आजार होऊ शकतो, अशी कबुली लस बनविणाऱ्या कंपनीने ब्रिटनच्या न्यायालयात दिली. ही ऑक्सफर्ड – ॲस्ट्राजेनेका लस अनेक देशांतील कोट्यवधी लोकांना कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या नावाने देण्यात आली. मात्र या लसीमुळे थ्राम्बोसायटोपेनिया (टीटीएस) हा आजार होऊ शकतो. या आजारात रक्तात गुठळ्या होतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. या आजारामुळे रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होऊ शकते.
ॲस्ट्राजेनेका या कंपनीविरोधात ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने न्यायालयात खटला दाखल केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ॲस्ट्राजेनेका कंपनीने विकसित केलेली लस घेतल्यानंतर स्कॉट यांना मेंदू विकार जडला. स्कॉट यांच्याप्रमाणे आणखी काही लोकांना लस घेतल्यानंतर आरोग्य विषयक समस्या उद्भवल्या. या लोकांनीदेखील कंपनीच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. ॲस्ट्राजेनेकाच्या लसीमुळे झालेल्या त्रासाबद्दल याचिकाकर्त्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कंपनीने कबूल केले की, या लसीमुळे टीटीएस हा आजार होऊ शकतो. या कबुलीमुळे याचिकाकर्त्यांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. ब्रिटननेही या लशीवर बंदी घातली आहे.
आपल्या लशीमुळे ज्या लोकांना काही आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागला, त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. यापुढे लस निर्मितीबाबत सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी ग्वाही कंपनीने न्यायालयात दिली.
मात्र त्याचवेळी आपल्या लशीमुळे कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार होण्याबाबत पसरविल्या जात असलेल्या अफवांचे कंपनीच्या वतीने जोरदार खंडण करण्यात आले आहे. लशीमुळे गंभीर आजार होत नाही असे कंपनीने सांगितले.