इस्लामाबाद – जगातल्या अनेक भागात सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका पाकिस्तानलाही बसत असून पाकिस्तानच्या अनेक भागातील पारा ५० अंश सेल्सियसच्या पार गेला आहे. पाकिस्तानातील उष्णतेचे सारे विक्रम मोडले असून काही भागातील पारा ५३ अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. प्रचंड उष्णतेमध्येच काही ठिकाणी वीज गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. या ठिकाणी चालणाऱ्या उष्ण हवेमुळे लोकांना घराच्या बाहेर निघणेही मुश्किल झाले आहे. सिंधच्या मोहनजोदारो शहरात गेल्या चोवीस तासात ५२ अंश सेल्सियसची नोंद झाली आहे. देशातील इतर काही भागातील तापमान ५४ अंश सेल्सिअस गेल्याची माहिती पाकिस्तानचे हवामान तज्ञ शाहिद अब्बास यांनी दिली आहे. उष्णतेमुळे बेकरी, चहाची दुकाने, इलेक्ट्रिक व मेकॅनिकची गॅरेज बंद आहेत. कराचीमध्येही तापमान अधिक असून तुरबत शहरातही सगळीकडे सामसुम दिसत आहे. यंदा उष्णता अधिक असली तरी पाऊसही अधिकच पडणार असल्याचेही पाकिस्तानी हवामान खात्याचे म्हणणे आहे.