विमानवाहू जहाजावर सोहळा संपन्न
ठाणे – मिरा भाईंदरच्या सागर सावंतला अमेरिकेचा अभियांत्रिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट टेक्निकल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अमेरिकेतील इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑटोमेशन या सर्वात मोठ्या संस्थेकडून पुरस्कार देण्यात आला असून अभियांत्रिक क्षेत्रात रोबोटिक्स व ऑटोमेशनमध्ये पंधरा वर्षे उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. चार्ल्सस्टन साऊथ कॅरिलोना येथील विमानवाहू जहाजावर २ ऑक्टोबरच्या पूर्वसंध्येला हा सोहळा पडला असून पुरस्कारप्राप्त सागर सावंतचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर शहरात राहणारा तरुण दत्तात्रय उर्फ सागर सावंत हा आपलं करिअर सांभाळून समाजसेवा ही करत आहे. हा त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गेल्या नऊ वर्षातला चौथा पुरस्कार असून यापूर्वी सन २०१६ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे अमेरिका अध्यक्ष जिमी केव्हिनी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट सल्लागार व मदतनीस म्हणून पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर सन २०१८ मध्ये Volunteer Leader म्हणून त्याला मानाचा पुरस्कार अमेरिका अध्यक्ष ब्रायन कट्रीस यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट Section Leader Excellence हा पुरस्कारही त्याच्या नावावर असून अमेरिका अध्यक्ष जिमी केव्हिनी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता एक पाऊल पुढे टाकत अभियांत्रिक क्षेत्रात रोबोटिक्स व ऑटोमेशन्स मध्ये सर्वोत्कृष्ट Excellence in Technical Achievement पुरस्कार त्याच्या शिरपेचात रोवला गेला आहे.
शिवसेनेकडून कौतुकीची थाप : सागर सावंत हा सामान्य कुटुंबात राहणारा आहे. वडिलांनी दिलेल्या इंजिनीरिंग क्षेत्रात आपले करिअर करून स्वतःच्या हिमतीवर विश्व निर्माण करून परदेशात त्याने नावलौकिक केले. शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी सांगत सावंत चे भरभरून कौतुक केले. समाजसेवेची आवड ही लक्षात घेऊन देशातील तरुण पिढीने याचे अनुकरण करावे असे आवाहन केले. तसेच देशाला पुढे नेणारे असे हुशार, सुशिक्षित तरुण वर्ग कार्यशील व्हायला पाहिजे अशी भावना यावेळी विचारे यांनी व्यक्त केली.